चिपळूण : गेली साडेतीन वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणारे चिपळूण उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनोद प्रकाश झगडे यांनी अखेर आज आपल्या पद आणि शिवसेनेच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला.स्वतः आयोजित केलेल्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्या भावना आणि सर्व शिवसैनिकांचे ऋण व्यक्त करून त्यांनी आपला राजीनामा जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांच्याकडे सुपूर्द केला.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अत्यंत कठीण काळात पक्षाने तालुकाप्रमुख या पदाची जबाबदारी विनोद झगडे याच्याकडे सोपवली होती.जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम सभापती पदाचा अनुभव आणि तालुक्यात दांडगा संपर्क असलेल्या झगडेनी अल्पावधीतच एक दमदार तालुकाप्रमुख म्हणून स्वतःला सिद्ध केले.त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ग्रामपंचायत,लोकसभा विधानसभा या सर्वच निवडणुकांमध्ये उबाठा शिवसेनेने लक्षवेधी कामगिरी केली.
अनेक ग्रामपंचायतींवर भगवा फडकला.लोकसभेला विनायक राऊत यांना सम्पूर्ण मतदारसंघात मोठे मताधिक्य दिले तर विधानसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रशांत यादव यांना देखील विजयाच्या जवळ नेऊन ठेवण्यात विनोद झगडे यांनी मोलाची कामगिरी बजावली.तालुका शिवसेनेचे बंद पडलेले संपर्क कार्यालय नव्याने सुरू करून त्यांनी कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचे काम केले.त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अगदी कमी कालावधीत विनोद झगडे यांनी आपल्या नेतृत्वाची छाप टाकली.
असे असताना लोकसभा विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर इथल्या पक्ष संघटनेत कमालीची शितीलता आली. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह राहिला नाही तर वरिष्ठ पातळीवरून देखील इथल्या शिवसैनिकांना बळ देण्यात दुर्लक्ष झाले.एकूणच या परिस्थितीत नेतृत्व सांभाळणे कठीण झाल्याने विनोद झगडे हे राजीनाम्याच्या निर्णयापर्यंत आले.तरीही वरिष्ठ पातळीवरून निराशा पदरी पडल्याने आज त्यांनी तालुका कार्यकारिणीची बैठक आयोजित केली या बैठक लावली.यावेळी त्यांनी आपल्या साडेतीन वर्षाच्या कारकीर्दीचा आढावा घेतला.
सर्व कार्यकर्त्यांचे ऋण व्यक्त करून आपल्या राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला.ज्यांच्या जीवावर आपण साडेतीन वर्ष ही जबाबदारी समर्थपणे पेलली त्या कार्यकर्त्यांशी मन मोकळं करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून निर्णय घ्यावा हाच आपला उद्देश असल्याचे झगडे यांनी सभागृहाला सांगितले. बैठकीत सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी विनोद झगडे यांच्या तालुकाप्रमुख म्हणून केलेल्या कामाचे कौतुक केले.पक्षाला आपली आज गरज आहे त्यामुळे आपण राजीनामा देऊ नये अशी भावना व्यक्त केली.
संपूर्ण कार्यकारिणी विनोद झगडे यांच्या पाठीशी ठाम असून त्यांचा राजीनामा पक्षाने मंजूर करू नये असा ठराव माजी तालुकाप्रमुख सुधीर शिंदे यांनी मांडला. सर्व सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात समर्थन दिले.मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहत झगडे यांनी अखेर आपला राजीनामा जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांच्याकडे सुपूर्द केला. आजच्या बैठकीला जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्यासह शिवसेना महिला आघाडी,युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.